मिरज प्रतिनिधी : अजितराव घोरपडे विद्यालयाची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी सायली सुधीर वसगडे हिने रेखाटलेल्या चित्राला महाराष्ट्र राज्य एनटीपीसी विभाग, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मानांकन मिळाले आहे. महाराष्ट्र राज्यातून निवड झालेल्या ५० उत्कृष्ट चित्रांमध्ये सायलीच्या चित्राचा समावेश झाला असून, सांगली जिल्ह्यातून निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक व कलात्मक गुणवत्तेचा गौरव झाला आहे.
महाराष्ट्र राज्य एनटीपीसी विभागाच्या वतीने 'ऊर्जा बचत व ऊर्जा संरक्षण' या विषयावर राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अजितराव घोरपडे विद्यालयाची विद्यार्थिनी सायली वसगडे हिने उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. तिने या विषयावर कल्पकतेने आणि प्रभावीपणे चित्र रेखाटले. तिच्या चित्राची राज्यस्तरावर निवड होऊन मानांकन प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, राज्यभरातून निवडण्यात आलेल्या ५० चित्रांमध्ये सांगली जिल्ह्यातून सायलीच्या एकमेव चित्राची निवड झाली आहे.
या यशाची दखल घेत सायलीला पुढील फेरीसाठी १४ नोव्हेंबर २०२६ रोजी एनटीपीसी विभाग, मुंबई येथे आयोजित प्रत्यक्ष चित्रकला स्पर्धेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे आता सायलीला राज्यस्तरावर आपली चित्रकलेची प्रतिभा सादर करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.
सायलीला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असून, अभ्यासाबरोबरच तिने आपला हा कलात्मक छंद जपला आहे. यापूर्वीही तिने विविध चित्रकला स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सातत्यपूर्ण सराव, कल्पकता आणि चित्रकलेप्रती असलेली आवड यामुळे तिने राज्यस्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अजितराव घोरपडे विद्यालय हे ग्रामीण भागातील नामांकित विद्यालय म्हणून ओळखले जाते. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा आणि विविध कौशल्यांच्या विकासालाही विद्यालयात विशेष महत्त्व दिले जाते. 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यालयाने विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. 'स्वच्छ एवं हरित विद्यालय' स्पर्धेत विद्यालयाने राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. तसेच 'परीक्षा पे चर्चा' या उपक्रमांतर्गत विद्यालयातील विद्यार्थ्याची महाराष्ट्रातून एकमेव निवड होण्याचाही मान विद्यालयाला मिळाला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, गेली सलग १६ वर्षे विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांकडून विशेष प्रयत्न केले जातात. मुख्याध्यापक डी. एन. पाटील यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाखाली विद्यालयाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे.
सायलीच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी तिचे अभिनंदन केले असून, मुंबई येथे होणाऱ्या पुढील प्रत्यक्ष स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. सायलीच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या