प्रतिष्ठा न्यूज
मुंबई प्रतिनिधी : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील न्यायालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे देण्यात आल्याने सोमवारी राज्यभर एकच खळबळ उडाली. ठाणे, सांगली, सोलापूर, सातारा, बीड, परभणी आणि हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमकीचे संदेश प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना करत न्यायालयीन इमारती रिकाम्या केल्या. न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकांकडून न्यायालय परिसराची तपासणी करण्यात येत असून सायबर पोलीस धमकीचे ई-मेल कोठून आणि कोणी पाठवले, याचा शोध घेत आहेत.
ठाणे जिल्हा न्यायालयाला प्राप्त झालेल्या ई-मेलमध्ये आयईडी स्फोट घडविण्याची धमकी देण्यात आली होती. २७ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात बॉम्बस्फोट घडविण्याचा उल्लेख या संदेशात करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच मेट्रो स्थानकांवर रात्री ९.११ वाजता स्फोट घडविण्याची धमकीही देण्यात आली होती. सन १९८४ मधील रक्तपाताचा बदला घेण्यासंदर्भातील मजकूर तसेच २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमात आयफोनमध्ये आयईडी ठेवून स्फोट घडविण्याची धमकीही ई-मेलमध्ये दिल्याचे समोर आले आहे.
ठाण्यात दोन्ही न्यायालयीन इमारती रिकाम्या
ठाणे जिल्हा न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर सकाळी ९.४३ वाजता बॉम्ब ठेवल्याचा संदेश प्राप्त झाला. दुपारी ३.११ वाजता स्फोट होणार असल्याचा उल्लेख या पंजाबी भाषेतील संदेशात होता. ई-मेल प्राप्त होताच पोलिसांनी मानक कार्यपद्धतीनुसार दोन्ही न्यायालयीन इमारती रिकाम्या केल्या. इमारतीतील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलविण्यात आले. ठाणे परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून इमारतींचे मजले, पार्किंग, कँटीन आणि संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली. गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे अधिकारीही तपासात सहभागी झाले आहेत.
सांगली जिल्हा न्यायालयातही तपासणी
सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने जिल्हा पोलीस दलाची यंत्रणा तातडीने सतर्क झाली. ई-मेल मिळताच न्यायालयातील न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि पक्षकारांना बाहेर काढण्यात आले. बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक न्यायालय परिसरात दाखल झाले. पोलिसांकडून संपूर्ण इमारतीची कसून तपासणी करण्यात आली. मेलमध्ये दुपारी ३.११ वाजता न्यायालयाची इमारत उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सोलापूर, सातारा, बीड आणि परभणीतही खबरदारी
सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयालाही धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी न्यायालय परिसरात दाखल झाले. न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांना सुरक्षितपणे बाहेर काढून संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. सातारा न्यायालयालाही धमकीचा संदेश मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
बीड जिल्हा सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर बॉम्ब ठेवल्याचा संदेश प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने न्यायालयाची इमारत रिकामी केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि न्यायालय परिसरात अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन केले.
परभणी जिल्हा न्यायालयातही धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि पोलिसांची विविध पथके न्यायालय परिसरात दाखल झाली. संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली.
हिंगोलीतही बॉम्बच्या धमकीने खळबळ
हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पोर्टलवरील अधिकृत ई-मेलवर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बॉम्बने न्यायालय उडवून देण्याची धमकी प्राप्त झाली. यानंतर शहर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. न्यायालयीन इमारतीची कसून तपासणी करण्यात आली. या प्रकरणाचा सायबर पोलिसांकडूनही तपास सुरू आहे.
सायबर पोलिसांकडून धमकीच्या ई-मेलचा मागोवा
राज्यातील अनेक जिल्हा न्यायालयांना एकाच वेळी धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याने या प्रकारामागे नेमके कोण आहे, याबाबत उत्सुकता आणि चिंता निर्माण झाली आहे. ई-मेलचा स्रोत, पाठविणाऱ्याची ओळख आणि संदेशातील धमक्यांची सत्यता तपासण्यासाठी सायबर पोलीस तसेच संबंधित जिल्ह्यांची गुन्हे अन्वेषण पथके कामाला लागली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व न्यायालयांची तपासणी करण्यात येत असून परिस्थितीवर वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष ठेवून आहेत. तपासणीनंतर न्यायालयीन कामकाज पूर्ववत सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, धमकीच्या ई-मेलमुळे राज्यातील न्यायव्यवस्थेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या