प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चित्रांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ तासगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शुक्रवारी जोडे मारो आंदोलन करण्यात आले.तासगाव येथील शिवतीर्थासमोर विविध निषेधाचे पोस्टर हातात घेत शिंदे गटासह भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोची जाणीवपूर्वक विटंबना करून महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांवरील गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या चर्चेला वेगळी दिशा देण्यासाठी हा प्रकार करण्यात आला,”असा आरोप त्यांनी केला.“शिवसेनाप्रमुखांच्या फोटोची अवहेलना हा भाजपने मांडलेला डाव असून, शिंदे शिवसेनेला भाजपने दिलेली सुपारी आहे,” असा थेट आरोपही काटकर यांनी केला.या आंदोलनादरम्यान संजय निरुपम, संजना घाडी आणि शायना एनसी यांच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी त्यांच्या छायाचित्रांना जोडे मारून संताप व्यक्त केला. शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभागी होत निषेध नोंदविला.‘शिवसेनाप्रमुखांचा अवमान सहन करणार नाही’, ‘महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका’ अशा घोषणांनी शिवतीर्थ परिसर दणाणून गेला.या आंदोलनामुळे तासगावच्या राजकीय वातावरणातही चांगलीच खळबळ उडाली.आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर,जिल्हा संघटिका सुजाताई इंगळे, उपजिल्हा संघटिका शोभाताई मुळीक, उपतालुकाप्रमुख पुरण मलमे आणि शहरप्रमुख प्रमोद सावंत यांनी केले.यावेळी शहाजी जाधव, पंडित राजमाने,दिलीप कोळीगुड्डे, संजय पाटील,बाहुबली पाटील, आनंदा दबडे, केतन कोरडे, जॉन जमादार, शंभूराज खरमाटे, पवन चव्हाण,अनुप शेटे,प्रमोद माळी, उमेश कुकडे,रूपाली सावंत, कामिनी कोळी यांच्यासह शिवसैनिक व महिला आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या