सांगली : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत सांगली विभागीय पुरुष क्रिकेट स्पर्धेचे आयोजन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे चिंतामणराव व्यापार महाविद्यालय, सांगली यांच्या वतीने करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, उद्योजक तथा सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. विश्वजीत पाटील यांच्या हस्ते उत्साहात झाले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य डॉ. आशिष पुराणिक, जिमखाना कमिटीचे अध्यक्ष डॉ. शार्दूल ठाकूर, डॉ. महेंद्र बागुल, श्री. रोहित वाले, प्रा. अण्णा पाटील, प्रा. सिद्धिविनायक शिंदे, प्रा. ऐश्वर्या कुलकर्णी, प्रा. सुशील बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी बोलताना विश्वजीत पाटील यांनी खेळाचे जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे शारीरिक व मानसिक क्षमता विकसित होण्यास मदत होते. खेळाडूंमध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि संघभावना निर्माण होते. स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करावे तसेच आगामी आंतरविभागीय स्पर्धेत चांगली कामगिरी करून सांगली जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. खेळाडूंनी नियमित सराव करून आरोग्य व शारीरिक सुदृढता जपावी. क्रीडा क्षेत्रातील यशाबरोबरच जीवनात आदर्श नागरिक होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक खेळाडूने खिलाडूवृत्ती जपत आपल्या सर्वोत्तम कौशल्याचे प्रदर्शन करावे, असे त्यांनी सांगितले.
पहिल्या सामन्यात गणपतराव आरवाडे कॉलेजचा विजय
स्पर्धेतील पहिला सामना गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली विरुद्ध चिंतामण मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना गणपतराव आरवाडे कॉलेजच्या संघाने निर्धारित डावात १५३ धावा केल्या. सार्थक पेटकर यांनी ४६, तर भीमाशंकर तेली यांनी ४० धावांचे योगदान दिले.
१५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चिंतामण मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा संघ ११० धावांमध्ये सर्वबाद झाला. त्यामुळे गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या संघाने ४३ धावांनी शानदार विजय मिळवत स्पर्धेत विजयी सुरुवात केली.
स्पर्धेसाठी पंच म्हणून अक्षय शितोळे, रोहित मंटूर व समर्थ सुतार यांनी काम पाहिले. स्पर्धेचे आयोजन प्रा. डॉ. गणेश सिंहासने व प्रा. अनिल खर्चे यांनी केले. संपूर्ण स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले असून, स्पर्धेला खेळाडू व क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या