सांगली : मुंबई येथे २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद पोलीस अधिकारी व जवानांना अभिवादन करण्यासाठी आयोजित सांगली ते मुंबई ४७० कि.मी. ‘शहीद दौड’ला शनिवारी सांगलीतून उत्साहात प्रारंभ झाला. पोलीस अधीक्षक तुषार दोषी व शहीद इंटरनॅशनलचे चेअरमन समित (दादा) कदम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौडचा सुरुवात करण्यात आला.
शहीद इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा २१ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत सांगली ते मुंबई अशी दौड आयोजित केली असून, १२ धावपटू हातात मशाल आणि भारताचा तिरंगा घेऊन शहीदांना अभिवादन करीत मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मुंबई पोलिसांनी अत्यंत धैर्याने आणि शौर्याने अतिरेक्यांचा सामना केला. देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता लढलेल्या शहीद जवानांच्या स्मृती जागृत ठेवणे, त्यांच्या बलिदानाचा आदर्श तरुण पिढीसमोर ठेवणे आणि राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणे हा या दौडचा मुख्य उद्देश आहे.
सांगली, तासगाव, विटा, पुसेसावळी, रहिमतपूर, सातारा, पुणे, लोणावळा, खंडाळा, खोपोली, पनवेल, नवी मुंबई चेंबूर माटुंगा मार्गे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे ही दौड पोहोचणार आहे. सहा दिवसांच्या या प्रवासात धावपटू सुमारे ४७० किलोमीटर अंतर पार करणार आहेत.
या दौडमध्ये पंढरीनाथ मारुती वडर, सुशांत बंडू मोरे, प्रसाद निवृत्ती कारंडे, आयुष कुमार चोरमले, आदर्श अजित अकिवाटे, जय अनिल महापुरे, सक्षम कुमार हिरवे, आर्यन मारुती मोरे, स्वप्नील माने, आदित्य लोखंडे, जयदिप घारगे आणि प्रतिक नलवडे हे १२ धावपटू सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमास सांगली जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवी पाटील (जत) डॉ. रियाज मुजावर, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या शहीद दौडच्या आयोजनासाठी श्रीकांत कुंभार, योगेश रोकडे, घनश्याम उके, संभाजी लोखंडे, ललित छाजेड, इनायत तेरदाळकर, देवदास चव्हाण, पै. अभिजीत पाटील, संतोष जाधव, निलेश मिसाळ, अभिजीत भोईटे, सचिन खोंद्रे, दिलीप रोकडे, नाना शिंदे, स्वप्नील माने, जयदिप घारगे, आदित्य लोखंडे, प्रतिक नलवडे, नितीन कदम, सुधीर भगत, अमित सोनवणे आणि हिना पठाण परिश्रम घेत आहेत.
शहीदांच्या बलिदानाला सलाम करण्यासाठी सुरू झालेली ही दौड राष्ट्रभक्ती, शौर्य आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या