प्रतिष्ठा न्यूज / दीपक शिंत्रे
विजयपूर : शहरातील एका कनिष्ठ वकिलाशी गैरवर्तन केल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी येथील कोर्ट सर्कलजवळ रस्ता रोखून वकिलांनी सुरू केलेले रात्रंदिवस धरणे आंदोलन बुधवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. बुधवारीही वकिलांनी न्यायालयीन कामकाजापासून पूर्णपणे दूर राहत आंदोलनात सहभाग घेतला.
वकिलावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला अटक होईपर्यंत आंदोलनस्थळ सोडणार नसल्याचा निर्धार आंदोलक वकिलांनी व्यक्त केला. रस्त्याच्या मध्यभागी आंदोलनासाठी मंडप उभारून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली.
येथील कनिष्ठ वकील प्रवीण यांच्या घरी काही समाजकंटकांनी जाऊन गैरवर्तन केल्याची घटना निषेधार्ह आहे. या कृत्यात सहभागी असलेल्या आरोपींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या वकिलांनी केली.
अशा घटनांमुळे संपूर्ण वकील समुदायाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे. हा केवळ एका वकिलावरील हल्ला नसून वकील समुदायाचा सन्मान, स्वाभिमान आणि व्यवसायावर केलेला हल्ला आहे. यापूर्वी वकील रवी अगरखेड यांची हत्या झाली होती. अलीकडेच बंगळूर येथे मंजुनाथ यांचीही हत्या झाली. वकिलांवरील सातत्याने होणारे हल्ले आणि अत्याचार निषेधार्ह आहेत.
आज एका वकिलावर हल्ला झाला असताना आपण गप्प राहिलो, तर उद्या आपल्यावर अशी घटना घडल्यास आपल्या पाठीशी कोण उभे राहणार? एका व्यक्तीवर झालेला अन्याय ही दुसऱ्याची समस्या आहे, अशा भावनेतून दुर्लक्ष करण्याची वृत्ती सोडली पाहिजे. वकिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायदा लागू करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
संपूर्ण वकील समुदाय जनतेला न्याय मिळवून देण्याच्या पवित्र कार्यात गुंतलेला आहे. मात्र, हेच न्यायदानाचे कार्य करणाऱ्या वकिलांवर हल्ले होत असतील, तर ही गंभीर बाब आहे. आरोपींना अटक करण्यासाठी वकिलांना आंदोलन करून रस्त्यावर उतरावे लागणे दुर्दैवी असल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेक वकिलांनी व्यक्त केली.
या आंदोलनात वकील संघटनेचे अध्यक्ष डी. जी. बिरादार, सुभाष छायागोळ, वकील विद्यावती अंकलगी, के. एफ. अंकलगी, एस. एस. खाद्री इनामदार, श्रीनाथ पुजारी, ए. टी. बिरादार, आझाद पटेल, एस. एस. शिराडोण, प्रवीण बिरादार, भरत कर्पूरमठ यांच्यासह मोठ्या संख्येने वकील सहभागी झाले होते.
भाजप-काँग्रेसच्या नेत्यांचा आंदोलनाला पाठिंबा
भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर कवटगी, भाजप जिल्हाध्यक्ष गुरुलिंगप्पा अंगडी, उपाध्यक्ष परशुरामसिंग रजपूत, रमेश बिदनूर, श्रीहर्षगौडा पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन वकिलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
काँग्रेसच्या नेत्यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. केपीसीसी सदस्य अब्दुल हमीद मुश्रीफ, अब्दुल रझाक होर्ती, दिनेश हळ्ळी आदींनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समर्थन दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या