प्रतिष्ठा न्यूज
सांगली : सांगली –मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कुपवाड विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालय क्र. ३, वॉर्ड क्रमांक ०९ मधील टी. के. पाटील सोसायटी, कुपवाड फाटा येथे सार्वजनिक ठिकाणी बांधकामाचा राडारोडा टाकल्याप्रकरणी योगी वल्लभ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीवर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती श्वेता सुर्वे, सहाय्यक आयुक्त (अतिक्रमण) श्री. सचिन सागावकर आणि मुख्य स्वच्छता अधिकारी श्री. याकूब मद्रासी यांच्या पथकाने ही कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी बांधकामाचा राडारोडा टाकल्यामुळे परिसराच्या स्वच्छतेवर व सार्वजनिक व्यवस्थेवर परिणाम होत असल्याने संबंधित कंपनीवर दंड आकारण्यात आला.
सदर दंडाची रक्कम संबंधित कंपनीच्या संचालकांनी धनादेशाद्वारे सहाय्यक आयुक्त श्रीमती श्वेता सुर्वे यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी स्वच्छता अधिकारी सिद्धांत ठोकळे, नगररचना अभियंता मंगळवारे, स्वच्छता निरीक्षक विकास कांबळे, गणेश धोतरे, अंजली कुदळे, लिपिक नितीन कांबळे, काशिनाथ पाटील आणि शिपाई प्रमोद जाधव उपस्थित होते.
सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकू नये; नागरिक व बांधकाम व्यावसायिकांना आवाहन
बांधकाम अथवा पाडकामातून निर्माण होणारा राडारोडा सार्वजनिक रस्ते, मोकळ्या जागा किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी टाकू नये. त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. शहराची स्वच्छता आणि सार्वजनिक जागांचे संरक्षण राखण्यासाठी नागरिक, बांधकाम व्यावसायिक व विकासकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या