सांगली, दि. 4 : सन 2026 च्या खरीप हंगामातील दुष्काळ जाहीर झालेल्या राज्यातील 304 तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या नुकसानी संदर्भात 5 हजार रूपये अग्रिम मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व दहाही तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले आहेत. या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार रूपये अग्रिम मदत जमा होण्यास सुरवात झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केल्याप्रमाणे व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होण्यासाठी दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्याच्या दृष्टीने कामकाज करण्यात आले. यासाठी महसूल, ग्रामविकास, कृषि आदि विभागांसह संबंधित सर्व यंत्रणांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण केली आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 90 टक्क्याहून अधिक शेतकऱ्यांना अग्रिम मदत मिळण्यासाठी मान्यता देण्यात आली असून अद्याप कार्यवाही सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, दुष्काळी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट अग्रिम मदत 5 हजार रूपये वाटप करण्यात करण्यात येणार आहे. पात्र शेतकऱ्यांना अग्रिम मदत थेट डीबीटीव्दारे देण्यात येणार आहे. दिनांक 1 नोव्हेंबर 2025 ते आज रोजीपर्यंत ज्यांनी विविध शासकीय योजनांतर्गत ई-केवायसी केली आहे त्यांची ई-केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) काढलेले नाही, त्यांनी फार्मर आयडी काढून शासकीय लाभासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करु नये, असे त्यांनी सूचित केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या