मिरज : कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मिरज आगारातर्फे विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. २० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी मिरज बसस्थानकातून ८ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
या विशेष बससेवेमुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. सदरच्या बससेवेस सर्व प्रकारच्या सवलती लागू राहणार आहेत. तसेच ४० पेक्षा जास्त भाविक किंवा प्रवाशांचा एकत्रित समूह गावातून उपलब्ध झाल्यास संबंधित गावातून थेट पंढरपूरसाठी बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या बसगाड्या मिरज ते पंढरपूर या मार्गावर मिरज, शिरढोण कवठेमहांकाळ, नागज फाटा, सांगोला या मार्गाने धावणार आहेत. दरम्यान, सदर बससेवेमध्ये महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजना तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सवलतींसह इतर सर्व शासकीय प्रवासी सवलती लागू राहणार आहेत. त्यामुळे भाविकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मिरज आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या