प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : ढवळी फाटा ते ढवळी बसस्थानक या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा देताच अखेर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांचा सामना करणाऱ्या वाहनधारकांना आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.ढवळी फाटा ते ढवळी बसस्थानक हा महत्त्वाचा मार्ग असून,रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.यापूर्वी या रस्त्याची दोन ते तीन वेळा दुरुस्ती करण्यात आली; मात्र काही कालावधीतच रस्त्याची पुन्हा दुरवस्था होत असल्याने दुरुस्तीच्या नावाखाली नेमके चालले तरी काय? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात होता.या प्रश्नाची दखल घेत मनसेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देत रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती.तसेच काम सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आंदोलन करण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता.मनसेच्या या आक्रमक भूमिकेनंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे ‘इशारा दिला अन् रस्ता दुरुस्तीला लागला’ अशी चर्चा परिसरात सुरू आहे.दरम्यान, केवळ काम सुरू करून प्रशासनाने मोकळे होऊ नये, तर रस्त्याचे काम दर्जेदार, टिकाऊ आणि शासनाच्या नियमांनुसार झाले पाहिजे, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.कामाच्या गुणवत्तेवर मनसेकडून लक्ष ठेवण्यात येणार असून निकृष्ट काम आढळल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांचा दर्जा जनतेच्या सोयीइतकाच महत्त्वाचा आहे.खड्डे बुजवून फोटो काढण्यापेक्षा टिकाऊ रस्ता उभा करा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे. मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारत जनतेच्या हक्कासाठी यापुढेही आक्रमकपणे लढा देणार असल्याचे मनसे नेते अमोल काळे यांनी सांगितले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या