प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:शहराची स्वच्छता आणि आरोग्यव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वर्षभर अहोरात्र मेहनत घेणाऱ्या तासगाव नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड झाली.दीपावली पाडव्याच्या निमित्ताने नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा तथा सार्वजनिक बांधकाम सभापती दिपालीताई दिग्विजय पाटील व मा.नगरसेवक दिग्विजय पाटील यांच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा आपुलकीने सन्मान करण्यात आला.शहरातील गटारे,रस्ते,सार्वजनिक स्वच्छतागृहे व मुताऱ्या स्वच्छ ठेवण्यापासून ते घराघरांत जाऊन घंटागाडीद्वारे कचरा संकलन व विलगीकरण करण्यापर्यंतची महत्त्वाची जबाबदारी सफाई कर्मचारी पार पाडतात. त्यांच्या कष्टाची दखल घेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना टॉवेल,टोपी,मिठाई व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.नगरपरिषदेतील हा वर्ग आर्थिकदृष्ट्या तुलनेने सामान्य असला,तरी शहराच्या आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या श्रमांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.दरम्यान, सौ.दिपालीताई पाटील व दिग्विजय पाटील यांच्या माध्यमातून यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात आले आहेत.बॉक्सर ग्रुप मित्रपरिवार व स्वामिनी वुमेन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून २००३ ते २०१९ या कालावधीत सलग १७ वर्षे किल्ले स्पर्धेचे आयोजन, ऊसतोडणी मजुरांना दिवाळी फराळाचे वाटप,महिलांसाठी पाककृती स्पर्धा तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे उपक्रम राबविण्यात आले आहेत.यावेळी नितीन सूर्यवंशी,समर्थ कदम,अनिकेत डिसले,राजू कदम,गणेश साळुंखे, अनिल शिंदे,अविनाश थोरवत, प्रशांत जाधव,पवन करमळकर व विजय कदम आदी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या