संग्रामपूर : दिवाळीचा आनंद केवळ स्वतःच्या घरापुरता मर्यादित न ठेवता, आयुष्यातील दुःखाची सावली दूर करून इतरांच्या जीवनात आनंदाचे दीप प्रज्वलित करणे, हीच सामाजिक बांधिलकीची खरी ओळख आहे. याच संवेदनशील भावनेतून जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघातील मातृत्व किंवा पितृत्वाचे छत्र हरवलेल्या २,५०० स्वनाथ बालकांसोबत आमदार डॉ. संजय श्रीराम कुटे यांनी दिवाळीचा आनंद साजरा केला. श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीने या बालकांना नवीन कपडे आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. रविवार, दि. ८ नोव्हेंबर रोजी सहकार विद्या मंदिर, जळगाव-जामोद येथे हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांच्या हस्ते बालकांना नवीन कपडे आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. बालपणातील आनंदाचे क्षण अनुभवण्याच्या वयातच कौटुंबिक आधार हरवलेल्या या बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे, त्यांना आपलेपणाची जाणीव व्हावी आणि त्यांच्या मनात जगण्याची नवी उमेद निर्माण व्हावी, या उदात्त हेतूने फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार डॉ. संजय श्रीराम कुटे म्हणाले की, राजकीय आणि सामाजिक जीवनात अनेक उपक्रम राबविण्याची संधी मिळाली; मात्र मातृत्व किंवा पितृत्वाची सावली हरवलेल्या निरागस बालकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे समाधान अनमोल आहे. या बालकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद कायम ठेवण्यासाठी श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. या बालकांना आधार देणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून आपले कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
ह.भ.प. संजय महाराज पाचपोर यांनीही बालकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्या जीवनात आनंद, प्रेम आणि आपलेपणाची भावना निर्माण करणे हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाला ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, ह.भ.प. पंढरीनाथ महाराज डीघोडे, ह.भ.प. प्रतिक महाराज खुपासे, ह.भ.प. भिकाजी महाराज मिरगे, ह.भ.प. गणेश महाराज बावस्कार यांच्यासह वारकरी संप्रदायातील मान्यवर, श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रमेश काळपाडे, फाउंडेशनचे सदस्य, भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुटे परिवाराकडून २,५०० बालकांच्या शिक्षण आणि आरोग्याची जबाबदारी
जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघातील मातृत्व किंवा पितृत्वाचे छत्र हरवलेल्या बालकांच्या शिक्षण आणि आरोग्याची जबाबदारी श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशनच्या माध्यमातून यापुढेही अविरतपणे पार पाडली जाईल, अशी ग्वाही आमदार डॉ. संजय श्रीराम कुटे यांनी दिली. ही सेवा केवळ आपल्यापुरती मर्यादित न राहता पुढील पिढीदेखील त्याच निष्ठेने पुढे चालवेल, असा संकल्प त्यांनी व्यक्त केला. माझ्या स्वतःच्या मुलांप्रमाणेच या बालकांचाही माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. त्यांना शिक्षण, आरोग्य किंवा अन्य कोणत्याही मदतीची गरज भासल्यास त्यांनी निःसंकोचपणे संपर्क साधावा. त्यांच्या प्रत्येक अडचणीत कुटे परिवार खंबीरपणे पाठीशी उभा राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या