प्रतिष्ठा न्यूज
कडेपूर : स्वतःला कॅबिनेट मंत्रीपद चालून आले असताना केवळ आपल्या दुष्काळी भागाच्या कल्याणासाठी मंत्रीपदाचा त्याग करून टेंभू उपसा सिंचन योजना पदरात पाडून घेणारे, कडेगाव तालुक्याची दुष्काळी ओळख पुसून तालुक्याला सुजलाम सुफलाम करणारे टेंभू योजनेचे शिल्पकार, स्व. आमदार दिवंगत नेते संपतराव देशमुख (आण्णा) यांच्या विचारांचा वारसा आजही कायम असल्याचे चित्र कडेपूर येथे पाहायला मिळाले. आज संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना, केवळ स्व. आण्णांच्या दूरदृष्टीमुळे कडेगाव तालुक्याने आज हिरवा शालू परिधान केला आहे. या महामानवाच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कडेपूर येथील त्यांच्या निवासस्थानी दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी असंख्य निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह संपतराव देशमुख, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालिका सौ. अपर्णाताई संग्रामसिंह देशमुख, स्व. आण्णांचे नातू व डोंगराई दूध संघाचे चेअरमन विश्वतेज संग्रामसिंह देशमुख यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. कडेगाव, पलूस तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर व हजारो निष्ठावंत कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांसाठी संग्रामसिंह देशमुख यांनी फराळ व चहा-पाण्याची अत्यंत उत्कृष्ट व्यवस्था केली होती. यावेळी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देताना संग्रामसिंह देशमुख यांच्या रूपाने जणू स्व. संपतराव आण्णाच अवतरल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आण्णांच्या विचारांवरच आमचा हा परिवार व तालुका पुढे चालणार असल्याचे मत यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या