प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी: जपानच्या क्योटो प्रांतातील क्योटांगो शहरातील कुमिहामा बे येथे ७ ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत आशियाई कॅनो, ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आशियातील १२ हून अधिक देशांतील अव्वल खेळाडू या प्रतिष्ठेच्या जलक्रीडा स्पर्धेत सहभागी होणार असून, भारतीय संघात महाराष्ट्रातील तीन खेळाडूंना संधी मिळाल्याने राज्याच्या क्रीडाक्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.भारतीय पुरुष गटात प्रथमेश पाटील आणि निरंजन पाटील, तर महिला गटात माहेश्वरी पाटील यांची निवड झाली आहे. तसेच भारतीय संघाचे व्यवस्थापक म्हणून दत्ता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य कयाकिंग असोसिएशनचे अध्यक्ष समीर मुंणगेकर, उपाध्यक्ष प्रताप जामदार आणि सचिव सुरेंद्र कोरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. भारतीय कयाकिंग असोसिएशनचे अध्यक्ष तसेच एशियन कॅनो फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत कुशवाह यांचेही मोलाचे सहकार्य या निवड प्रक्रियेत लाभल्याचे सांगण्यात आले.
या अजिंक्यपद स्पर्धेत भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, थायलंड, फिलीपिन्स, सिंगापूर, तैवान, कझाकिस्तान, हाँगकाँग यांच्यासह आशियातील १२ पेक्षा अधिक देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. कॅनो, स्टँड-अप पॅडलबोर्ड (SUP) आणि ड्रॅगन बोट या प्रकारांतील रंगतदार आणि चुरशीच्या स्पर्धा कुमिहामा बे येथे पार पडणार आहेत.
आयोजकांच्या मते, आशियातील सर्वोत्तम खेळाडूंचा थरार या स्पर्धेत अनुभवायला मिळणार असून, २०२७ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड मास्टर्स गेम्सच्या तयारीच्या दृष्टीनेही या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे.
महाराष्ट्रातील खेळाडूंची भारतीय संघात झालेली निवड ही राज्याच्या जलक्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद बाब मानली जात असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या