सांगली, प्रतिनिधी : सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील चार सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून ११ गावठी पिस्तुले, दोन स्पेअर मॅगझिन, २२ जिवंत काडतुसे असा एकूण ७ लाख ६२ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आटपाडी पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध शस्त्र तस्करीविरोधात मोठे यश मिळाले आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एलसीबीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की, रेकॉर्डवरील आरोपी मयुरेश मनोहर आवाडे हा आटपाडी तालुक्यातील मिंध्याळ येथे येणार असून त्याच्याकडे गावठी पिस्तूल आहे. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
चौकशीत मयुरेश आवाडे याने ही शस्त्रे मारुती अशोक गुजले याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी मारुती गुजलेला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन गावठी पिस्तुले, तीन जिवंत काडतुसे आणि एक वायरची पिशवी जप्त केली.
पुढील तपासात ही शस्त्रे वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे याच्याकडून मिळाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यालाही अटक करून त्याच्याकडून सात गावठी पिस्तुले, १७ जिवंत काडतुसे, दोन स्पेअर मॅगझिन आणि एक काळी कापडी बॅग जप्त केली.
चौकशीत वैभव इंगळे याने ही शस्त्रे 'पाजी' (रा. सैधवा, मध्यप्रदेश) या व्यक्तीकडून विकत घेतल्याची कबुली दिली. संबंधित आरोपीचा शोध सुरू असून, तो सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून अवैध शस्त्रांची विक्री करत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मयुरेश मनोहर आवाडे (सध्या चाकण, पुणे), मारुती अशोक गुजले (जांभुळखेडा, ता. खानापूर), वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे (ताडाची वाडी, ता. खानापूर) तसेच 'पाजी' (रा. मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.
या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोहेकॉ. हणमंत लोहार, सुशील मरके, सुनील जाधव, प्रमोद सारखरे, अभिजित रणगेकर, हेद्रराज होळकर, सुमित सूर्यवंशी, रोहन घसते, गणेश शिंदे, सुशांत पिले तसेच सायबर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
जप्त मुद्देमाल
११ गावठी पिस्तुले
२ स्पेअर मॅगझिन
२२ जिवंत काडतुसे
काळी कापडी बॅग व वायरची पिशवी
एकूण किंमत : ७,६२,२१० रुपये
पोलिसांनी आरोपींकडून अवैध शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा तपास सुरू केला असून, या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या