कोल्हापूर, ता. ६ : राज्यात सलग सहाव्या दिवशीही मुसळधार पावसाचा जोर कायम असून पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पंचगंगा नदीची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही अफवा न पसरवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी ३४ फूटांवर पोहोचली असून जिल्ह्यातील ४४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांत २०२ मिमी पावसाची नोंद झाली असून धरणातील पाणीसाठा ३.७४ टीएमसी झाला आहे. नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक परिसरात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत अत्यावश्यक कामाशिवाय मुंबई–पुणे प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील तीन तासांत काही ठिकाणी मध्यम ते अतिजोरदार पाऊस, तसेच ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
लोणावळ्यात गेल्या २४ तासांत ६७० मिमी, तर भिरा येथे ६०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून खबरदारीचा उपाय म्हणून महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा या तालुक्यांतील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महाबळेश्वरमध्ये गेल्या २४ तासांत ५१३ मिमी पावसाची नोंद झाली असून अनेक भागांत पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तर सततच्या पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठा २७.६६ टीएमसीवर पोहोचला असून धरण क्षेत्रात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदी, ओढे आणि पूरग्रस्त भागाजवळ जाणे टाळण्याचे, अनावश्यक प्रवास न करण्याचे तसेच आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या