प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
सांगली : कृष्णा सहोदय कॉम्प्लेक्स, सांगली यांच्या वतीने आयोजित किक स्टार्ट फुटबॉल चॅम्पियनशिप 2026-27 ही १५ वर्षांखालील मुलांची फुटबॉल स्पर्धा आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल, सांगली येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अजिंक्यपद पटकावले.
स्पर्धेत एकूण १० संघांनी सहभाग घेतला होता. पहिल्या सामन्यात पोदार संघाने एमआयटी स्कूल, सांगलीचा ३-० अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात विश्वराज भोसले यांनी दोन, तर श्लोक राजपूत यांनी एक गोल करत संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेले.
दुसऱ्या सामन्यात पोदार संघाने यजमान आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलचा १-० अशा गोलफरकाने पराभव केला. वेदांत हवलदार यांनी केलेल्या निर्णायक विजयगोलमुळे पोदार संघाने अंतिम फेरीत धडक मारली.
अंतिम सामन्यात पोदार संघाने झील इंटरनॅशनल स्कूल, बामणोली या संघाचा २-१ अशा गोलफरकाने पराभव करून स्पर्धेचे अजिंक्यपद आपल्या नावावर केले. या सामन्यात अहिल नदाफ आणि श्लोक राजपूत यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्पर्धेतील उत्कृष्ट बचावात्मक खेळासाठी श्लोक राजपूत याला 'उत्कृष्ट डिफेंडर' हा वैयक्तिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. संघाच्या या यशामागे फुटबॉल प्रशिक्षक आसिफ सारवान यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. जी. बी. पाटील, उपप्राचार्या सौ. विद्या आवटे, क्रीडा विभाग प्रमुख श्री. सुजित वाघमोडे तसेच सर्व क्रीडाशिक्षकांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या भावी क्रीडा कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या