प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : बीट टू बीट स्टुडिओचे क्रिएटिव्ह हेड आणि प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक ओंकार रोकडे यांना जपानमध्ये सलग तिसऱ्या वर्षी भारतीय नृत्यकला आणि बॉलीवूडचे प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे जपानमधूनही त्यांना विशेष मागणी येत असून, त्यांच्या कलेची आणि योगदानाची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जात आहे.
Abundance च्या पूर्वी जवेरी यांच्या माध्यमातून जपानमधील कोबे शहरातील नागरिकांसाठी विशेष बॉलीवूड डान्स वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. आठवडाभर चाललेल्या या कार्यशाळेला जपानी महिला आणि तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दररोज सुमारे ४० ते ५० नवीन सहभागी या कार्यशाळेत येत होते. भारतीय नृत्यशैली शिकण्यासाठी ते दररोज दोन ते तीन तास आवर्जून देत होते.
भारतीय संस्कृती, नृत्यावरील त्यांचे प्रेम, शिकण्याची त्यांची जिद्द आणि भारतीय कलेविषयीचा आदर पाहून ओंकार रोकडे भारावून गेले.
*या यशाबद्दल बोलताना ओंकार रोकडे म्हणाले, "भारतीय नृत्यकलेला आणि बॉलीवूडला जपानमध्ये मिळणारे प्रेम अत्यंत प्रेरणादायी आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून भारताची संस्कृती जगभर पोहोचवण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझे गुरु महेश पाटील यांच्या संस्कारातून, मार्गदर्शनातून आणि त्यांच्याकडून मिळालेल्या कलेच्या वारशातूनच हा प्रवास जागतिक स्तरापर्यंत पोहोचू शकला आहे."*
*सांगलीतून आपल्या नृत्यप्रवासाची सुरुवात करून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय नृत्यकलेचा ठसा उमटवणारे ओंकार स्नेहल भास्कर रोकडे यांचे हे यश जिल्ह्यासह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.*
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या