प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र म्हणून ओळखला जातो. या दिवशी सूर्य उत्तर गोलार्धात सर्वाधिक उत्तरेकडे दिसतो. या खगोलीय घटनेला उन्हाळी संक्रांती (Summer Solstice) असे म्हटले जाते. या निमित्ताने डॉ. जयंत नारळीकर खगोलशास्त्र क्लब, किड्स पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, सांगली यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष खगोल निरीक्षण उपक्रम राबविण्यात येत आहे.
उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पृथ्वीच्या अक्षाचा 23.5 अंशांचा कल, सूर्याच्या किरणांचा पृथ्वीवरील परिणाम, वर्षातील सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र यामागील वैज्ञानिक कारणे समजावून घेता यावीत, तसेच 21 जूनपासून सूर्याच्या आभासी भ्रमणात होणाऱ्या बदलांमुळे दक्षिणायनाची सुरुवात कशी होते याविषयी माहिती घेण्यात यावी.
विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळील एखाद्या स्थिर खुणेच्या (झाड, इमारत किंवा अन्य स्थिर वस्तू) संदर्भाने सूर्योदयाचे स्थान निरीक्षण करून त्याचे छायाचित्र घ्यावं. पुढील काही दिवस सूर्योदयाच्या स्थानात होणारे बदल नोंदवून त्याचे वैज्ञानिक निरीक्षण करण्यात यावे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राविषयी उत्सुकता निर्माण होऊन निरीक्षण, नोंदणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होणार असल्याचे मत आयोजकांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनीही या अनोख्या खगोलीय घटनेबद्दल उत्साहाने सहभाग नोंदवत सूर्योदय निरीक्षणाची तयारी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या