प्रतिष्ठा न्यूज
सांगली : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ऐतिहासिक विलिंग्डन महाविद्यालय, सांगलीच्या प्राचार्यपदी रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. सिद्धेश्वर ज्ञानेश्वर जाधव यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे शैक्षणिक, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे.
डॉ. जाधव यांनी शिवाजी विद्यापीठातून बी.एस्सी. व एम.एस्सी. पूर्ण करून आयसीटी, मुंबई येथून रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली आहे. तसेच SET परीक्षा उत्तीर्ण होऊन योग-शिक्षक डिप्लोमाही पूर्ण केला आहे.
त्यांना दोन दशकांहून अधिक अध्यापनाचा अनुभव असून, विलिंग्डन महाविद्यालयात २०१९ पासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबईतील कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालय, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर येथे अध्यापन केले आहे.
डॉ. जाधव यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांचे १३ संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत. चार पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. शिवाय अनेक विद्यापीठीय समित्यांवर सदस्य म्हणून त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे सदस्य, सांगली जिल्हा सांस्कृतिक समन्वयक, एकात्म मानवदर्शन समन्वयक तसेच विविध शैक्षणिक व प्रशासकीय समित्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल शिक्षण, सामाजिक व संशोधन क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थी, माजी विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विलिंग्डन महाविद्यालयाची शैक्षणिक, संशोधन व गुणवत्ता विकासाची वाटचाल अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या