सांगली प्रतिनिधी : राज्यातील दोन्ही संभाजी ब्रिगेड यांच्या एकत्रीकरणानंतर सांगली जिल्हा कार्यकारिणीची पहिली आढावा बैठक उत्साहात पार पडली. मराठा सेवा संघाच्या सांगली येथील कार्यालयात झालेल्या बैठकीत संघटनात्मक बांधणी, आगामी वाटचाल आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आर. एस. पवार, संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही संघटनांच्या एकत्रीकरणानंतर संघटना अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी आर. एस. पवार यांनी संघटन विस्ताराला प्राधान्य देत लवकरच रिक्त पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले. संघटनेच्या नावाचा किंवा पदाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
हर्षवर्धन मगदूम यांनी मार्गदर्शन करताना संभाजी ब्रिगेडची वाटचाल अधिक आक्रमकपणे सुरू राहील, असे स्पष्ट केले. बहुजन समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना सातत्याने संघर्ष करेल आणि सामाजिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेईल, असे त्यांनी सांगितले.
या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या सांगली महानगर अध्यक्षपदी प्रमोद सूर्यवंशी यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी सूर्यवंशी यांनी समाजविघातक शक्तींना संभाजी ब्रिगेडकडून सडेतोड उत्तर दिले जाईल, असे सांगितले. तसेच युवकांना रोजगार, सामाजिक प्रबोधन आणि संघटन बळकटीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
बैठकीस मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते अमृत सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष श्रेयश नाईक, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) उमेश शेवाळे, बाळासाहेब पाटील, राजेंद्र जाधव, युसूफ मिस्त्री, शिवाजी जाधव, रोहित शिंदे, नरेंद्र मोहिते, शिवमती अरुणा कोळी, शिवमती संगीता मोरे, इस्लामपूर शहराध्यक्ष अजित हवलदार तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या