सांगली प्रतिनिधी : खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील तब्बल सात वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने कराड येथून अटक केली. गोपाळ संगप्पा पुजारी (वय २९, मूळ रा. रेवणाळ, ता. जत, जि. सांगली, सध्या रा. कामगार चौक, कराड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात २०१९ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपी गोपाळ पुजारी हा फरार होता. महावीर कॉलनी, जुना दामणी रोड, सांगली येथे झालेल्या हाणामारीत गणेश बबनदाते यांच्यावर वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याप्रकरणी त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३०७ तसेच शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील इतर आरोपींना यापूर्वी अटक झाली होती; मात्र गोपाळ पुजारी सात वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने फरार आरोपींचा शोध मोहीम सुरू केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाला गोपनीय माहिती मिळाली की आरोपी कराड शहरात येणार आहे.
माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने कराड येथील एसटी स्टँड परिसरात सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव गोपाळ संगप्पा पुजारी असल्याचे सांगितले. खात्री झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार तसेच एलसीबी पथकातील कर्मचारी रजनीत जाधव, अतुल माने, प्रकाश पाटील, संदीप पाटील, श्रीधर वाघडी, अभिजित माळकर, ऋषिकेश ससाणे, विनायक सनदी आणि इतर सहकाऱ्यांनी केली.
अटक आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या