तासगाव प्रतिनिधी : तासगाव तालुक्यातील नेहरूनगर येथे नंदीवाले प्रीमियर लीग (NPL) २०२६ अंतर्गत आयोजित भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि. १३ जून) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. युवा शक्ती, क्रीडा संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या स्पर्धेला परिसरातील क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रदीप काका माने पाटील आणि शिवसेना-शिव उद्योग सहकार सेना, सांगली जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदीप काका माने पाटील यांनी युवकांनी मैदान आणि ग्रंथालयाशी नाते जोडण्याची गरज व्यक्त केली. “तरुणांनी जास्तीत जास्त वेळ क्रीडांगणावर आणि ग्रंथालयात घालवला पाहिजे. अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत आणि चुकीच्या प्रवृत्तीविरोधात उभे राहण्याची वृत्ती प्रत्येक युवकामध्ये असणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
कुलदीप देवकुळे यांनी आपल्या मनोगतात शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली. “व्यसनमुक्त आणि सुदृढ समाजाची निर्मिती झाली तरच सक्षम राष्ट्र उभे राहू शकते,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्य नंदीवाले समाज संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी राजेंद्र भोसले (चेअरमन, बालाजी ग्रामीण पतसंस्था), प्रदीप मोकाशी (व्हाईस चेअरमन), आर. डी. अप्पा पाटील (एम.डी., नागेवाडी साखर कारखाना), रामदास जाधव (ग्रामपंचायत सदस्य, नेहरूनगर), प्रमोद भोसले (जिल्हाध्यक्ष, डी.पी.आय.) यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर, क्रीडाप्रेमी, खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील तब्बल २४ क्रिकेट संघांनी सहभाग नोंदवला असून सामने चुरशीच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात सुरू आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सागर पाटील, ज्ञानेश्वर नंदीवाले, परशु नंदीवाले, सुरज नंदीवाले आणि आशुतोष मोकाशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
क्रीडा, संघभावना, सामाजिक सलोखा आणि युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देणारी नंदीवाले प्रीमियर लीग २०२६ ही स्पर्धा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून समाजातील सकारात्मक ऊर्जेला नवी दिशा देणारा उपक्रम म्हणून तिचे कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या