सांगली प्रतिनिधी : मराठा सेवा संघ, सांगली यांच्या वतीने आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात संभाजी ब्रिगेडची एकत्रित वाटचाल अधिक प्रभावीपणे सुरू राहील, असे प्रतिपादन केले. समाजातील तरुणांनी सामाजिक प्रगतीसोबत स्वतःची वैयक्तिक प्रगतीही साधावी आणि "अहद ऑस्ट्रेलिया ते तहद कॅनडा अवघा मुलुख व्यापावा" या ध्येयाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री आर. एस. पवार यांनी प्रवीण गायकवाड तसेच विभागीय अध्यक्ष हर्षवर्धन मगदूम यांचे स्वागत केले. कार्यक्रमाची प्रस्तावना कार्याध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
मार्गदर्शन करताना गायकवाड यांनी विविध समाजांनी शिक्षण, उद्योग आणि संघटनशक्तीच्या बळावर केलेल्या प्रगतीची उदाहरणे देत त्यांचे अनुकरण करण्याची गरज व्यक्त केली. समाजबांधवांनी व्यापक दृष्टीकोन स्वीकारून देश-विदेशात आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे धनाजी गुरव, राष्ट्र सेवा दलाचे रोहित शिंदे, मराठा फाउंडेशनचे उद्योजक तसेच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक कक्षाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवमती संगीता मोरे यांनी केले, तर शिवश्री अमर पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या