सांगली प्रतिनिधी : माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातील पुनर्प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला नवे वळण मिळाले आहे. ३० जून रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता हा प्रवेश ऐनवेळी लांबणीवर पडल्याची माहिती समोर येत असून, सांगली भाजपमधील काही नेत्यांच्या विरोधामुळे हा निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
संजयकाका पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर ते फारसे सक्रिय दिसले नाहीत. उलट अनेक कार्यक्रमांत ते भाजपच्या नेत्यांसोबत व्यासपीठावर दिसू लागले. भाजपच्या विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती वाढल्याने त्यांच्या 'घरवापसी'च्या चर्चांना अधिक बळ मिळाले.
याच पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत संजयकाका पाटील यांच्या भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा केली होती. "संजयकाका हे मूळचे भाजपचेच आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे ते राष्ट्रवादीत गेले होते. आता विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, ३० जून रोजी त्यांचा पक्षप्रवेश होईल," असे त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कराड येथे संजयकाका पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर सांगलीतही दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. या बैठकीतच पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय झाल्याची चर्चा होती.
मात्र, ऐनवेळी परिस्थिती बदलल्याचे चित्र समोर आले आहे. सांगली जिल्ह्यातील भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी संजयकाका पाटील यांच्या प्रवेशाला विरोध दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ३० जून रोजी नियोजित असलेला पक्षप्रवेश स्थगित करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनानंतर राज्यभरातील प्रमुख नेत्यांचा एकत्रित पक्षप्रवेश आयोजित केला जाणार असून, त्यामध्ये संजयकाका पाटील यांचाही प्रवेश होऊ शकतो, असा निरोप भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे संजयकाका पाटील यांच्या समर्थकांमध्ये काहीशी निराशा पसरली असून, जिल्ह्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. भाजपमधील अंतर्गत समीकरणे, स्थानिक नेतृत्वाचा विरोध आणि आगामी निवडणुकांची रणनीती या सर्व पार्श्वभूमीवर संजयकाका पाटील यांचा पक्षप्रवेश नेमका कधी होणार, याकडे आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
(टीप : पक्षांतर्गत विरोध व प्रवेश लांबणीवर पडल्याबाबतची माहिती राजकीय चर्चांवर व सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असून, याबाबत संबंधित पक्षाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.)
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या