सांगली प्रतिनिधी : पत्रकार संरक्षण कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच पत्रकारांविषयी आक्षेपार्ह, अपमानास्पद व धमकीचे वक्तव्य करणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शासन आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ते निःपक्षपातीपणे काम करतात. जनतेचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे, लोकप्रतिनिधींना जबाबदार धरणे आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यामध्ये पत्रकारांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी पत्रकारांबाबत अपमानास्पद, धमकीची अथवा अवमानकारक भाषा वापरणे ही अत्यंत गंभीर बाब असून ती लोकशाही मूल्यांना धक्का देणारी आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, खासदार संजय दिना पाटील यांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली असली तरी घडलेला प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. केवळ माफी मागून अशा घटनांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भविष्यात कोणत्याही लोकप्रतिनिधीने पत्रकारांशी अशा प्रकारे वागण्याचे धाडस करू नये, यासाठी संबंधितांवर योग्य ती शिस्तभंगाची आणि कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.
यावेळी पत्रकारांनी राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित केला. वारंवार घडणाऱ्या पत्रकारांवरील हल्ले, धमक्या आणि दबावाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार संरक्षण कायद्याची तातडीने प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच पत्रकारांचा सन्मान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी निवेदन स्वीकारून पत्रकारांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी, विविध पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी तसेच जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांनी एकजुटीने पत्रकारांच्या सन्मान, सुरक्षितता आणि स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी शासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या