पलूस : क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता, कौशल्य आणि खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने तसेच जिल्हा क्रीडा परिषद, सांगली, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली आणि पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धा २०२६ चा उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी पलूस येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या खेळाडूंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार सेलचे अध्यक्ष विवेक धुमाळे, स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रदीप (आप्पा) कदम आणि जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर मैदानावर उपस्थित खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दि. १८ ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये १९ वर्षांखालील मुले व मुली या दोन गटांत सामने खेळविण्यात येत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांतील शालेय खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य सिद्ध करण्यासाठी आणि राज्यस्तरावर आपली गुणवत्ता प्रदर्शित करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हँडबॉलसारख्या वेगवान आणि कौशल्यपूर्ण खेळाच्या निमित्ताने पलूसच्या क्रीडांगणावर राज्यभरातील खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देत शालेय जीवनात खेळाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने लढण्याची वृत्ती विकसित होते. विजय-पराजयापेक्षा खेळातील सहभाग, सातत्यपूर्ण सराव आणि खिलाडूवृत्ती अधिक महत्त्वाची असल्याचा संदेश या प्रसंगी देण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्याला संजय कदम, महेश साळुंखे, मनीषा गारगोटे, उज्वला लांडगे मॅडम, अभिजित राऊत सर यांच्यासह पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश उदाले, उपाध्यक्ष संदेश कुलकर्णी, सचिव धोंडीराम शिंदे उपस्थित होते. तसेच सीनियर कॉलेजचे प्राचार्य आर्य साळुंखे, दाभाडे सर, उपप्राचार्य वाय. जे. पाटील, उपमुख्याध्यापक डी. एम. बडगुजर, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. जयमाला पाटील यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, क्रीडा शिक्षक, खेळाडू आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडांगणावर आयोजित या स्पर्धेमुळे पलूसच्या क्रीडा क्षेत्राला राज्यस्तरीय ओळख मिळण्याबरोबरच स्थानिक विद्यार्थ्यांनाही उच्चस्तरीय खेळाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळाची मेजवानी क्रीडारसिकांना अनुभवता येणार आहे.
राज्यस्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेच्या आयोजनातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच शालेय क्रीडा संस्कृतीला बळकटी देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, उद्घाटन सोहळ्याने स्पर्धेची उत्साहपूर्ण सुरुवात झाली.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या