गगनबावडा : दिवाळीचा आनंद हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा असावा, याच भावनेतून आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबे तर्फ कळे संचलित पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा यांच्यावतीने एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दुर्गम आणि डोंगराळ भागातील तळये पैकी धनगरवाडा (ता. गगनबावडा) येथील वंचितांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचवत महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
दुर्गम भागाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास
आनंदी शिक्षण संस्थेने शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या, अतिवृष्टीचा सामना करणाऱ्या आणि दुर्गम भागाचा सर्वांगीण विकास व्हावा, या उदात्त उद्देशाने या महाविद्यालयाची स्थापना केली आहे. केवळ उच्च शिक्षणाचे धडे न देता सामाजिक जाणिवा जोपासत महाविद्यालयाने यंदा धनगरवाड्यातील कुटुंबांसाठी दिवाळी फराळ आणि भेटवस्तू वाटपाचा विशेष उपक्रम राबवला.
आवश्यक वस्तूंची भेट आणि आनंदाची शिदोरी
या उपक्रमांतर्गत धनगरवाड्यातील प्रत्येक कुटुंबाला दिवाळीचा फराळ, बिस्किटांचे पुडे, सुगंधी तेल, साबण आणि गुळाची ढेप अशा उपयुक्त भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. जेव्हा या आदिवासी वस्तीवरील महिला आणि चिमुरड्यांच्या हातात या भेटवस्तू पडल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद आणि समाधान शब्दांत न सांगता येण्यासारखा होता.
मान्यवरांचे मार्गदर्शन व पुढाकार
हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी आनंदी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सतीश देसाई आणि सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई यांचे बहुमूल्य प्रोत्साहन लाभले. तसेच, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील आणि विज्ञान विभाग प्रमुख प्रा. सौरभ देसाई यांच्या विशेष पुढाकाराने हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व दणक्यात संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या या संवेदनशील भूमिकेमुळे धनगरवाड्यातील रहिवाशांची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंददायी आणि प्रकाशमय ठरली असून, परिसरातुन या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या