प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 19 : सांगली शहरात रॅपिडो अॅपच्या माध्यमातून दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसार गाजरे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 नोव्हेंबर 2026 रोजी ही कारवाई करण्यात आली.रॅपिडो अॅपच्या माध्यमातून दुचाकी वाहनांचा वापर करून आवश्यक परवाना व अधिकृत मान्यता नसताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून कारवाई करण्यात आली. ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक आकाश कांबळे व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सिद्धार्थ कोल्हाटे यांनी केली.
महाराष्ट्र राज्यात अधिकृत मान्यता नसताना अशा प्रकारच्या अॅपचा वापर करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवास करू नये, असे आवाहन परिवहन विभागामार्फत नागरिकांना करण्यात आले आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकृत परवाना व मान्यता असलेल्या सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवांचाच वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या