प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव: ढवळी फाटा ते ढवळी बसस्थानक या प्रमुख रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून, नागरिक व वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दोन-तीन वेळा रस्त्याची दुरुस्ती होऊनही पुन्हा खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘गट्ट्या’ भेट देत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येबाबत मनसेच्या वतीने गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र, वारंवार सूचना करूनही खड्डे व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने मनसेचे जिल्हा संघटक अमोल (भैय्या) काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कार्यालयात भेट घेऊन जाब विचारला.‘दोन-तीन वेळा काम होऊनही पुन्हा खड्डे पडत असतील, तर कामाचा दर्जा काय?’ असा सवाल उपस्थित करत जनतेच्या पैशांचा योग्य विनियोग होत आहे का,याचीही चौकशी व्हावी,अशी मागणी यावेळी करण्यात आली.काम सुरू असताना प्रत्यक्ष पाहणी न करणाऱ्या व केवळ वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना गट्ट्या भेट देत मनसेने आपला संताप व्यक्त केला. केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता रस्त्यावरील सर्व खड्डे दर्जेदार पद्धतीने बुजवून कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी अमोल काळे म्हणाले, “जनतेच्या जीवाशी खेळणारा निकृष्ट कारभार महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापिही खपवून घेणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असताना केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कामातून उत्तर द्यावे. रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती तातडीने न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”ढवळी फाटा ते ढवळी बसस्थानक या रस्त्याची तातडीने पाहणी करून दर्जेदार दुरुस्ती करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या