सांगली, दि. 5 : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बाधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे तसेच स्थानिक पातळीवर खाजगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या 4 नोव्हेंबर अखेरच्या अहवालानुसार 52 खाजगी व 8 शासकीय अशा एकूण 60 टँकरव्दारे 61 गावे व 435 वाड्यातील 1 लाख 29 हजार 590 बाधित लोकसंख्येला व 11 हजार 346 पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 26 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित केल्या आहेत.
जत तालुक्यातील टंचाईग्रस्त 52 गावे व 366 वाड्यांमधील सुमारे 1 लाख 12 हजार, 210 लोकसंख्येला 51 टँकरद्वारे (44 खाजगी व 7 शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात 15 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या असून 4 डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 8 वाड्यांमधील 1834 लोकसंख्येसाठी 1 शासकीय टँकर सुरू आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे गावात पाणीटंचाई भासू नये यासाठी 2 खाजगी विहिरी/बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 6 वाड्यांमधील 855 लोकसंख्येला 1 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुक्यात 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
आटपाडी तालुक्यातील टंचाईग्रस्त 7 गावे व 55 वाड्यांमधील 14691 नागरिकांना आणि 11346 पशुधनाला 7 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. या तालुक्यात 3 विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.
खानापूर तालुक्यात 2 गावे टंचाईग्रस्त असून 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या