विजयपूर : अंगणवाडी केंद्रात दिलेली अंडी खाल्ल्यानंतर सात मुले आजारी पडल्याची घटना बसवनबागेवाडी तालुक्यातील मसबीनाळ गावातील शिवानंदनगर येथील अंगणवाडी केंद्रात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अंगणवाडी केंद्रात भोजन केल्यानंतर मुलांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अंगणवाडीत एकूण आठ मुले असून, त्यापैकी सात मुलांची प्रकृती बिघडली. सहा मुलांना पुढील उपचारासाठी विजयपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर एका मुलावर बसवनबागेवाडी तालुका रुग्णालयात उपचार करण्यात आले.
अंगणवाडी केंद्रात मुलांना खराब अंडी दिल्याचा आरोप होत असून, या प्रकरणावरून सीडीपीओ शिल्पा हिरेमठ यांच्याविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा उपसंचालक संतोषकुमार यांनी विजयपूर जिल्हा रुग्णालयात जाऊन आजारी मुलांची विचारपूस केली. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले. अंगणवाडीतील अन्नधान्य व पाण्याची तपासणी जिल्हा निरीक्षण अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या