विजयपूर : सहकार क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महिला, युवक तसेच समाजातील दुर्बल घटकांचा सक्रिय सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सी. ऐ. सुभाष एस. इंडी यांनी केले.
कर्नाटक राज्य सहकार महामंडळ, बेंगळुरू, विजयपूर जिल्हा सहकारी युनियन आणि श्री सिद्धेश्वर सहकारी बँक, विजयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 73 व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहाच्या सहाव्या दिवसाचा उद्घाटन समारंभ 19 नोव्हेंबर 2026 रोजी विजयपूर येथील शिवानुभव मंटप येथे उत्साहात पार पडला. यावेळी ‘महिला, युवक आणि समाजातील दुर्बल घटकांचा सहकार क्षेत्रातील सहभाग’ या विषयावर मार्गदर्शन करताना सी. ऐ. इंडी बोलत होते.
कार्यक्रमास परमपूज्य श्री म.घ.च. गुरुशांत देव शिवाचार्य महास्वामी, गुरुपादेश्वर संस्थान बृहन्मठ, सुक्षेत्र बबलेश्वर यांची दिव्य उपस्थिती लाभली. श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र एस. बिज्जरगी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सहकार क्षेत्राचे पितामह यांच्या प्रतिमेस श्रीहर्षगौड एस. पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्य सहकार महामंडळाचे संचालक के. बी. पाटील, सहकारी संस्थांच्या उपनिबंधक एस. के. भाग्यश्री, सहाय्यक निबंधक चेतन भाविकट्टी तसेच सहकार विकास अधिकारी एस. डी. मनगोळी उपस्थित होते.
सहकार क्षेत्रात महिलांचा, युवकांचा आणि दुर्बल घटकांचा सहभाग वाढल्यास सहकार चळवळीला अधिक व्यापक सामाजिक आधार मिळेल. आर्थिक स्वावलंबनासोबतच समाजातील विविध घटकांना सहकाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभावी उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास चैतन्य महिला बँकेच्या अध्यक्षा श्रीमती मल्लम्मा याळवार, श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे संचालक आर. एच. बिदनूर, एस. जी. गच्चिनकटी, श्रीमती बोरम्मा बी. गोब्बूर, आर. एस. कत्ती, डॉ. संजीव एस. पाटील (मुळवाड), ए. एम. नायकोडी, के. व्ही. औरंगाबाद आदी उपस्थित होते.
तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर आर. ए. पाटील (उप्पलदिन्नी), व्ही. डी. कपूरमठ, श्री. एस. एस. भोवी, सौ. एस. एस. भोगशेट्टी , सहकार भारती जिल्हा संघटना सचिव दिपक शिंत्रे आणि विविध सहकारी बँकांचे कर्मचारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे प्रधान व्यवस्थापक जे. बी. कल्याणशेट्टी तसेच जिल्हा सहकारी युनियनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती के. एन. पारगोंड यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सहकार सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून सहकार क्षेत्रात नव्या पिढीचा सहभाग वाढविण्यासह महिला व दुर्बल घटकांना अधिक संधी देण्याचा संदेश देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या