प्रतिष्ठा न्यूज / किरण कुंभार
तासगाव : केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री आवास योजना’ अंतर्गत मंजूर झालेल्या मात्र अद्याप अपूर्ण असलेल्या घरकुलांच्या कामांना गती देण्यासाठी तासगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी थेट फिल्डवर उतरून लाभार्थ्यांच्या घरांना भेटी देण्यास सुरुवात केली आहे. येत्या आठ दिवसांत घरांची बांधकामे पूर्ण करा, अन्यथा वितरित निधी परत करा, अशी स्पष्ट तंबी त्यांनी संबंधित लाभार्थ्यांना दिली आहे. तसेच, मुदतीत बांधकाम पूर्ण न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे’ या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत तासगाव नगरपरिषदेच्या वतीने वैयक्तिक स्वरूपातील बांधकाम (BLC) या घटकांतर्गत नवीन घरांच्या बांधकामासाठी लाभार्थ्यांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आले होते. या योजनेतून पात्र लाभार्थ्यांना बांधकामासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र, निधी मिळूनही काही लाभार्थ्यांची घरकुले अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी २६ ऑक्टोबर २०२६ पासून अपूर्ण घरकुलांची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी संबंधित लाभार्थ्यांशी संवाद साधून बांधकामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली. तसेच, उर्वरित कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
निधीचा बोजा लाभार्थ्यांवर पडण्याची शक्यता
‘प्रधानमंत्री आवास योजना २०२२’ या योजनेचा निर्धारित कालावधी संपला असल्याचे सांगत, शासनाकडून पुढील निधी प्राप्त न झाल्यास त्याचा आर्थिक बोजा संबंधित लाभार्थ्यांवर पडू शकतो, असे मुख्याधिकारी लेंडवे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता घरांची बांधकामे तातडीने पूर्ण करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.
शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेऊनही बांधकामे अपूर्ण ठेवणाऱ्या लाभार्थ्यांना आता प्रशासनाने गांभीर्याने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवसांत किती घरकुलांची कामे पूर्ण होतात, याकडे लक्ष लागले आहे.
या पाहणीवेळी नगररचना सहायक प्रफुल्ल पाटील आणि CLTC अभियंता अश्विनकुमार कोकणे उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या