प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तालुक्यातील विविध गावांमध्ये विहिरी व बोअरवेलवरील विद्युत केबल आणि पंप मोटारी चोरीला जाण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.आधीच शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या चोऱ्यांमुळे अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.आठवड्यातून दोन-तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. यापूर्वी दाखल झालेल्या तक्रारींचा तपास कुठपर्यंत पोहोचला, किती गुन्हे उघडकीस आले आणि चोरीचा किती मुद्देमाल हस्तगत झाला, याबाबत पोलिसांनी माहिती द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.चोरीच्या केबल व मोटारींची विक्री कुठे होते, याचा शोध घेण्याबरोबरच भंगार व्यावसायिकांच्या व्यवहारांचीही आवश्यकतेनुसार कायदेशीर चौकशी करावी,अशी मागणी होत आहे.ग्रामीण भागातील रात्रीची गस्त अधिक प्रभावी करणे, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे आणि प्रलंबित तक्रारींचा तपास वेगाने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सिंचनासाठी आवश्यक साहित्य चोरीला गेल्याने पाणीपुरवठा खंडित होण्याबरोबरच नवीन केबल व मोटार खरेदीचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी तासगाव पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना वाढवून चोरीच्या प्रकरणांचा तपास प्रभावीपणे करावा,अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या