मिरज : महादेव कॉलनी घरेलू कामगार गट, मिरज यांच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राजा मंगळवेढेकर लिखित आणि साने गुरुजी यांच्या पंढरपूर येथील उपोषणावर आधारित ‘पंढरीस वाजे घंटा’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उपक्रमातून वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याबरोबरच सामाजिक समता, मानवता आणि महिला सक्षमीकरणाच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
या पुस्तकाचे प्रकाशन परिसरातील नगरसेविका सौ. अपर्णा विवेक शेटे, सामाजिक कार्यकर्त्या ॲड. पूजा जाधव, आरोग्य संवादक शीतल व्हनकडे, युवराज मगदूम, किरण कांबळे तसेच घरेलू कामगार महिलांच्या हस्ते करण्यात आले.
साने गुरुजी यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे, या उद्देशाने केलेल्या उपोषणाचा ऐतिहासिक संदर्भ ‘पंढरीस वाजे घंटा’ या पुस्तकातून समोर येतो. सामाजिक समता, अस्पृश्यता निर्मूलन आणि माणुसकीच्या मूल्यांसाठी झालेल्या संघर्षाची आठवण करून देणारे हे पुस्तक आजच्या काळातही महत्त्वपूर्ण आहे. अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाजसुधारकांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
महादेव कॉलनीतील घरेलू कामगार महिलांना सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि सामाजिक प्रश्नांविषयी जागरूकता वाढवणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने महिलांना एकत्र येऊन विविध सामाजिक विषयांवर संवाद साधण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाला परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे आणि वाचनसंस्कृतीचा प्रसार करणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
कार्यक्रमाचे संयोजन किरण कांबळे, रुपाली कांबळे, पूजा पागद, सविता कांबळे, अर्चना गुरव, वैशाली कांबळे, ज्योत्स्ना गाडवे, युवराज मगदूम आदींनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या