सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आक्रमक भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, तसेच पाण्याचे योग्य नियोजन करून सर्वांना न्याय मिळावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आज जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पाणीटंचाई, कृष्णा नदीतील पाण्याची उपलब्धता आणि पाणीवाटपाचे नियोजन हे महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले.
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पाण्याच्या नियोजनाअभावी कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांसह कृष्णा नदीवर आधारित पिण्याच्या पाणीपुरवठा योजना असलेल्या अनेक गावांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत आले असून, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे.
या परिस्थितीची पूर्वकल्पना देत संजयकाका पाटील यांनी काही दिवसांपूर्वी वारणाली येथील जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पाण्याचे योग्य नियोजन वेळेत केले नाही, तर भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, त्यानंतरही सांगली जिल्ह्याच्या पाणीवाटपाबाबत योग्य नियोजन झाले नसल्याने आज जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
हक्काच्या पाण्यापासून सांगली जिल्ह्याला वंचित ठेवू नका!
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देत पाणीवाटपाच्या नियोजनातील त्रुटींवर लक्ष वेधले. सांगली जिल्ह्याला मिळणाऱ्या पाण्याचे नियोजन पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने व्हावे, शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेला पुरवठा सुनिश्चित करावा आणि कोणत्याही गावावर अन्याय होऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
जिल्ह्यातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत असताना केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार सर्व संबंधित भागांना न्याय देणारे नियोजन करावे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
एकीकडे पाणीटंचाईमुळे शेतकरी आणि ग्रामीण जनता संकटात सापडली असताना दुसरीकडे नियोजनातील त्रुटींचा फटका जिल्ह्याला बसू नये, यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर संजयकाका पाटील यांनी बैठकीत शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या