प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे, असे असताना तासगाव नगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभारामुळे दररोज हजारो लिटर पाणी ओसंडून वाहून वाया जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकारास पाणीपुरवठा विभागाचे अभियंता मनोज खरात हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रीय दलित पँथर सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत केदार यांनी केला असून खरात त्यांच्यावर तातडीने शिस्तभंगासह निलंबनाची कारवाई करावी, या मागणी मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांचेकडे निवेदनाद्वारे प्रशांत केदार यांनी केली आहे.मुख्याधिकारी यांना दिलेल्या प्रशांत केदार यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, वरचे गल्ली भागातील जोतिबा मंदिर परिसरात असलेली नगरपालिकेची मोठी पाण्याची टाकी भरल्यानंतरही पाणीपुरवठा विभागाचे अभियंता आणि कर्मचारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.साडेसात लाख लिटर क्षमतेच्या या टाकीमधून दररोज पाणी ओसंडून वाहून रस्त्यावर सांडते.एकीकडे सामान्य नागरिकांना वेळेवर आणि पुरेसे पाणी मिळत नसताना,दुसरीकडे प्रशासकीय निष्काळजीपणामुळे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र आहे.जोतिबा मंदिर परिसरातील या टाकीवरून वरचे गल्लीसह ढवळवेस, आश्रम शाळा परिसर, लो.अण्णाभाऊ साठेनगर, भारती विद्यामंदिर परिसर, विष्णू गल्ली या भागातील सुमारे १५०० ते २००० नळ कनेक्शनधारकांना पाणीपुरवठा केला जातो.एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा पाणीपुरवठा या टाकीवर अवलंबून असताना, पाण्याचे योग्य नियोजन व नियंत्रण ठेवणे ही अभियंता मनोज खरात यांची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, दुष्काळी स्थितीचे कोणतेही भान न ठेवता अत्यंत निष्काळजीपणे कारभार सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
प्रशासनाने दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी गांभीर्याने पावले उचलावीत. जर विहित कालावधीत संबंधित अभियंत्यावर योग्य ती शिस्तभंगविषयक आणि निलंबनाची कारवाई केली गेली नाही, तर तासगाव नगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे.
*सखोल चौकशी अन् तात्काळ निलंबनाची मागणी*
नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना नियमित पाणी पुरवणे, टाक्या ओसंडून वाहणार नाहीत यावर नियंत्रण ठेवणे आणि पाणीपुरवठा यंत्रणेची योग्य देखभाल करणे या कर्तव्यात अभियंता मनोज खरात यांनी कसूर केली आहे. या बेजबाबदार कार्यपद्धतीची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि खरात यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या