सांगली : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या वतीने आयोजित शिवाजी विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय महिला क्रिकेट स्पर्धेत महावीर महाविद्यालय, कोल्हापूर संघाने विजेतेपद पटकावले. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली संघाला उपविजेतेपद मिळाले. या स्पर्धा २६ व २७ ऑक्टोबर २०२६ रोजी चिंतामणराव व्यापार महाविद्यालय आणि वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या क्रीडांगणावर उत्साहात पार पडल्या.
स्पर्धेतील विजेत्या महावीर महाविद्यालय, कोल्हापूर संघाला श्री शिवाजी शिक्षण संस्था, कराड यांच्याकडून देण्यात येणाऱ्या वेणूताई चव्हाण कायम फिरत्या चषकाचा मान मिळाला. तसेच एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने प्रथम चार क्रमांक पटकावणाऱ्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
प्रथम क्रमांक : महावीर महाविद्यालय, कोल्हापूर
द्वितीय क्रमांक : कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली
तृतीय क्रमांक : विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर
चतुर्थ क्रमांक : गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली
अंतिम सामन्यात महावीर कॉलेजचा विजय
महावीर महाविद्यालय, कोल्हापूर आणि कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली यांच्यात अंतिम सामना झाला. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना ७९ धावांचे लक्ष्य महावीर महाविद्यालयासमोर ठेवले. या डावात सरस्वती कोकरे हिने २८, तर स्नेहल टाकळे हिने ३९ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल महावीर महाविद्यालयाच्या रसिका शिंदे हिने ३८ धावा, तर श्रावणी लकडे हिने १७ धावांचे योगदान दिले. अर्पिता नायकवडी, आकांक्षा राजमाने आणि वृंदा मेढे यांनी गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. त्यांच्या सांघिक प्रयत्नांच्या जोरावर महावीर महाविद्यालयाने विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयाकडून अनुजा खंडागळे, स्नेहल टाकळे आणि सरस्वती कोकरे यांनी गोलंदाजीत उल्लेखनीय कामगिरी केली.
तृतीय क्रमांकासाठी अटीतटीची लढत
तृतीय क्रमांकासाठी गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्स, सांगली आणि विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर यांच्यात सामना झाला. विवेकानंद महाविद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना ७६ धावांचे आव्हान जी. ए. कॉलेजसमोर ठेवले. या डावात मिसाब सय्यद हिने ४५, तर प्रियांका नांद्रे हिने ६ धावा केल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना जी. ए. कॉलेजचा संघ ६० धावांत बाद झाला. त्यांच्याकडून सायली पोळ हिने १८, तर कल्याणी शेनवडे हिने २२ धावा केल्या. त्यामुळे विवेकानंद महाविद्यालयाने विजय मिळवत तृतीय क्रमांक पटकावला.
वैयक्तिक पुरस्कारांचे वितरण
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
प्लेअर ऑफ द मॅच : कु. रसिका शिंदे – महावीर महाविद्यालय, कोल्हापूर
उत्कृष्ट फलंदाज : कु. सरस्वती कोकरे – कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली
उत्कृष्ट गोलंदाज : कु. अनुजा खंडागळे – कस्तुरबाई वालचंद महाविद्यालय, सांगली
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ एयू स्मॉल फायनान्स बँकेचे शाखा व्यवस्थापक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी अक्षय कुलकर्णी, सागर मुळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंभार यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी शिवाजी विद्यापीठ निवड समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश फराकटे, निवड समिती सदस्य डॉ. सुचय खोपडे, स्पर्धा निरीक्षक डॉ. श्रीदेवी हिरूगडे, पात्रता समितीचे अध्यक्ष संजय पाटील, तांत्रिक समितीचे अध्यक्ष सुधीर वाटवे, रोहित वाले, एन. डी. बनसोडे, पंच म्हणून काम पाहणारे अक्षय शितोळे व प्रेम माने, सांगली जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव संजय पाटील, महाविद्यालयाच्या जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. शार्दुल ठाकूर, डॉ. महेंद्र बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अनिल खर्चे, किशोर चंदुरे, अजित पाटील, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. गणेश सिंहासने, अशोक पवार आणि क्रीडा विभागातील विद्यार्थी सिद्धार्थ कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व विजेत्या संघांचे अभिनंदन करून खेळाडूंना पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या