सावळज : शहीद भगतसिंग गणेश मित्र मंडळ, खुजगाव ता. तासगाव यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी खुजगाव येथे रक्तदान शिबिर, मॅमोग्राफी तपासणी शिबिर तसेच रेटिनोपॅथी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिरामध्ये गावातील युवक, महिला व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “आपले रक्तदान—कोणासाठी तरी जीवनदान” या संदेशातून रक्तदानाचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने 40 वर्षांवरील महिलांसाठी मॅमोग्राफी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, सुमारे ₹६५०० किंमतीची तपासणी मोफत करण्यात येणार आहे. पहिल्या ४० महिलांना प्राधान्य देण्यात येणार असून, त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
तसेच रेटिनोपॅथी तपासणी शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह, डोळ्यांच्या समस्या असलेल्या व्यक्तींसह सर्व नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात येणार आहे. मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा तसेच मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यांबाबत तपासणी व तज्ज्ञांचा सल्ला तसेच मोफत उपचार सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली यांच्यामार्फत करून देण्यात येणार आहे.
मॅमोग्राफी शिबिर यशवंत आबा विद्यालय, खुजगाव येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत, तर रक्तदान शिबिर मारुती मंदिर, खुजगाव येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. रेटिनोपॅथी तपासणी वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी आहे.
या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ मिडटाउन सांगली, शहीद भगतसिंग गणेश मित्र मंडळ खुजगाव, श्री गणेश मित्र मंडळ, बालगणेश मित्र मंडळ, मोरया फ्रेंड्स सर्कल, शिवगर्जना मित्र मंडळ व समर्थ नगर आदींचे सहकार्य लाभत आहे.
सर्व नागरिकांनी या आरोग्य व सामाजिक उपक्रमाचा लाभ घ्यावा आणि रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या