पलूस प्रतिनिधी : राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQSA) स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत अंकलखोप प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हास्तरावर मानांकन प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान मिळवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा स्व. यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप (आप्पा) कदम यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याचबरोबर पलूस तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र, सावंतपूर यांनीही राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQSA) राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल डॉ. वैभव पाटील व त्यांच्या संपूर्ण टीमचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.
सत्कारप्रसंगी प्रदीप (आप्पा) कदम यांनी आरोग्य विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक आणि आशा स्वयंसेविकांचे अभिनंदन केले. गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग करत असलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेतही यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील वाटचालीत आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या यशामागे आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक आणि आशा स्वयंसेविकांनी केलेल्या समर्पित कार्याचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेही यावेळी कौतुक केले.
या प्रसंगी महेश हजारे, कुलदीप वारे, अरविंद लांडगे, तुषार सूर्यवंशी, अक्षय व्हरे, विनय बिराजदार, तुकाराम धायगुडे, विखे पाटील कृषी परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजयदादा शिंदे, अभिषेक झेंडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेवक आणि आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या