प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव नगर परिषदेच्या सर्कससिंह कै.परशुराम माळी सभागृहात अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था,मुंबई यांच्या वतीने नगरसेवक,नगरसेविका व पदाधिकाऱ्यांसाठी 'सभाशास्त्र' या विषयावरील मार्गदर्शनपर प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या प्रशिक्षणात संस्थेचे मानद संचालक श्री.लक्ष्मणराव लटके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सभांचे नियोजन,सभेचे कामकाज,इतिवृत्त लेखन,ठराव मंजुरीची प्रक्रिया,नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,सभापती व नगरसेवकांचे अधिकार व कर्तव्ये, तसेच महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमातील महत्त्वाच्या तरतुदी याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून विषय सोप्या भाषेत उलगडून सांगितल्याने उपस्थितांना सभेच्या कामकाजातील कायदेशीर बाबी समजून घेण्यास मोठी मदत झाली.प्रशिक्षणादरम्यान नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी विविध शंकांचे निरसन करून घेतले.सभेचे कामकाज अधिक प्रभावी,पारदर्शक आणि लोकाभिमुख पद्धतीने कसे पार पाडावे याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमास तासगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. विजयाताई पाटील,उपनगराध्यक्ष प्रसाद पैलवान,सर्व विषय समित्यांचे सभापती,नगरसेवक,नगरसेविका तसेच नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रशिक्षणामुळे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना सभेचे कामकाज अधिक प्रभावी,कायदेशीर आणि लोकाभिमुख पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक ज्ञान मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.भविष्यातही अशा प्रकारची प्रशिक्षण सत्रे नियमितपणे आयोजित करण्यात यावीत,अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तासगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर लेंडवे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या