प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 25 - टेंभू उपसा सिंचन प्रकल्प टप्पा पाच अंतर्गत खानापूर तालुक्यातील भूड येथील वितरण हौदाची राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ, जलसंपदा विभाग पुणेच्या मुख्य अभियंता अलका अहिरराव, सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महादेव कदम, कार्यकारी अभियंता सीमा मोहिते, प्रज्ञा यादव, राजन डवरी, अभिनंदन हरूगडे, हर्षद यादव आणि श्री. मासाळ आदि उपस्थित होते. गोरेवाडी डाव्या व उजव्या कालव्यावरुन तासगांव, खानापूर व कवठेमहांकाळ तालुक्यातील ६,०१० हे. क्षेत्रास बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेद्वारे पाणी देण्याचे नियोजित आहे. या अनुषंगाने मंत्री श्री. विखे पाटील यांनी ही भेट देऊन पाहणी केली.
पंपगृह टप्पा क्र.५ मधून उर्ध्वगामी नलिकेद्वारे पाणी बलवडी येथील वितरण हौदामध्ये सोडण्यात येते. बलवडी वितरण हौदामधून गोरेवाडी उजवा कालवा, गोरेवाडी डावा कालवा व भूड देविखिंडी कालवा हे तीन कालवे निघतात. टेंभू विस्तारीत प्रकल्पांतर्गत गोरेवाडी डाव्या कालव्यास समांतर गोरेवाडी डावी थेट गुरुत्व नलिका प्रस्तावित केलेली आहे. या नलिकेद्वारे तासगांव व कवठेमहांकाळ तालुक्यातील ५४८२ हे. सिंचन क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावीत आहे.
गोरेवाडी उजव्या कालव्याच्या शेवटापासुन वायफळे बिरणवाडी वितरीका निघते. या वितरीकेद्वारे खानापूर व तासगाव तालुक्यातील ४९८ हे. सिंचन क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे प्रस्तावीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या