प्रतिष्ठा न्यूज | मिरज प्रतिनिधी
सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कारचा शनिवारी सायंकाळी मिरजजवळ रत्नागिरी-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात आमदार गाडगीळ यांच्यासह वाहनातील सहकारी सुखरूप बचावले असून एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सुधीर गाडगीळ हे कर्नाटकातील उगार येथून सांगलीकडे परतत असताना मिरजजवळ त्यांच्या चारचाकी वाहनाची एका दुचाकीशी जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की गाडगीळ यांच्या वाहनाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात आमदार गाडगीळ यांच्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली. मात्र त्यांच्यासोबत वाहनात असलेले स्वीय सहाय्यक अमोल कणसे, अंगरक्षक नागेश भोकरे, छायाचित्रकार विकास गुंडप आणि चालक गणपती दरेकर यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. वाहनातील एअरबॅग वेळेवर उघडल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू असून प्राथमिक माहितीनुसार चारचाकी आणि दुचाकीची धडक झाल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सुदैवाने आमदार सुधीर गाडगीळ व त्यांच्या सहकाऱ्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान आमदार सुधीर गाडगीळ यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पाठवून सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.
नमस्कार.
रत्नागिरी-नागपूर महामार्गावर आमच्या वाहनाचा अपघात झाला. ईश्वराच्या कृपेने मोठी दुर्घटना टळली.
या अपघातात माझ्या हाताच्या बोटाला किरकोळ दुखापत झाली असून हाताला चार टाके पडले आहेत. डॉक्टरांनी आवश्यक उपचार करून काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. माझी प्रकृती स्थिर असून मी पूर्णपणे सुरक्षित आहे.
माझ्यासोबत असलेले माझे स्वीय सहाय्यक, अंगरक्षक, छायाचित्रकार आणि वाहनचालक हे सर्व सुखरूप आहेत. तसेच समोरच्या वाहनातील व्यक्तीदेखील सुरक्षित असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीतही लवकर सुधारणा व्हावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीद्वारे तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी विचारपूस करणाऱ्या सर्व आप्तेष्ट, हितचिंतक, मित्रपरिवार, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादामुळे मी लवकरच पूर्ववत कार्यरत होईन.
धन्यवाद..!
धनंजय उर्फ सुधीर हरी गाडगीळ
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या