प्रतिष्ठा न्यूज | सांगली प्रतिनिधी
सांगलीतील विश्रामबाग परिसरात पतीचा गळा आवळून खून करून तो दारूच्या नशेत बेशुद्ध पडल्याचा बनाव रचल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावत पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पल्लवी आनंद सर्जे (वय २२, रा. पोट मळा, विद्यानगर, सांगली) आणि दिपक आप्पासाहेब आजमाने (वय ३१, रा. सिद्धीविनायक अपार्टमेंट, बापट मळा, सांगली) यांचा समावेश आहे. या प्रकरणातील मृताचे नाव आनंद हणमंत सर्जे (वय २८) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जूनच्या रात्री आनंद सर्जे यांना दारूचे व्यसन असल्याने ते घरीच बेशुद्ध पडल्याचे सांगत पत्नी व नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मृत्यू संशयास्पद वाटल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर तपासाची दिशा बदलली. तपासादरम्यान पत्नी पल्लवी सर्जे आणि तिचा परिचित दिपक आजमाने यांच्या हालचाली संशयास्पद आढळल्या.
पोलिसांनी दोघांकडे सखोल चौकशी केली असता, पती आनंद सर्जे दारूच्या नशेत झोपलेले असताना दोघांनी मिळून त्यांच्या पाय ओढून गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर बेशुद्ध पडल्याचा बनाव करून त्यांना रुग्णालयात नेण्यात आल्याचेही उघड झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना वास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व त्यांच्या पथकाने केली.
या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या