प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
नवी दिल्ली : देशातील वैद्यकीय शिक्षणासाठीची सर्वात महत्त्वाची प्रवेश परीक्षा मानल्या जाणाऱ्या NEET (UG) 2026 संदर्भात राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने मोठी घोषणा केली आहे. भारत सरकारच्या मान्यतेनंतर NEET (UG) 2026 ची पुनर्परीक्षा रविवार, दि. 21 जून 2026 रोजी घेण्यात येणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
NTA कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेनुसार, परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र, वेळापत्रक आणि इतर महत्त्वाच्या सूचनांची माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा आणि चुकीची माहिती प्रसारित होत असल्याने विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी केवळ NTA च्या अधिकृत संकेतस्थळ, सोशल मीडिया हँडल्स आणि प्रसिद्धीपत्रकांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. कोणत्याही अप्रमाणित संदेशांना बळी न पडण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
NEET (UG) ही देशातील एमबीबीएस, बीडीएस तसेच इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची परीक्षा आहे. त्यामुळे या परीक्षेकडे विद्यार्थ्यांसह पालक आणि शैक्षणिक संस्थांचेही विशेष लक्ष लागलेले असते. पुनर्परीक्षेच्या निर्णयानंतर विद्यार्थ्यांनी नव्या उत्साहाने तयारीला सुरुवात केली असून, अनेक कोचिंग संस्थांनीही विशेष मार्गदर्शन सत्रांचे नियोजन सुरू केले आहे.
परीक्षेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांना neet-ug@nta.ac.in या ई-मेलवर संपर्क साधण्याचे तसेच 011-40759000 या हेल्पलाईन क्रमांकावर माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या