प्रतिष्ठा न्यूज | सांगली प्रतिनिधी
बेकायदेशीररित्या पिस्टल विक्रीसाठी आलेल्या एका युवकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४ देशी बनावटीची पिस्टल, ४ जिवंत काडतुसे, मोटारसायकल आणि सॅक असा एकूण २ लाख ६७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी विटा-तासगाव रोडवरील श्री मंगल कार्यालय परिसरात केली.
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांविरोधात विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, विटा ते तासगाव रोडवरील श्री मंगल कार्यालय परिसरात एक इसम पिस्टल विक्रीसाठी येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव धिरज सतीश चव्हाण (वय २१, रा. पारे रोड, बजरंगनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) असे सांगितले.
पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये ४ देशी बनावटीची पिस्टल तर पॅन्टच्या खिशात ४ जिवंत काडतुसे आढळून आली. संबंधित अग्निशस्त्र बाळगण्याबाबत कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत आरोपीने ही पिस्टले मध्यप्रदेशातील एका व्यक्तीकडून खरेदी करून जादा दराने विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली.
या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
जप्त मुद्देमाल
४ देशी बनावटीची पिस्टल – किंमत २,४०,००० रुपये
४ जिवंत काडतुसे – किंमत २,००० रुपये
बजाज सीटी १०० मोटारसायकल – किंमत २५,००० रुपये
एक सॅक – किंमत ४०० रुपये
एकूण जप्त मुद्देमाल : २,६७,४०० रुपये
या कारवाईत पोहेकॉ सुर्यकांत साळुंखे, संजय पाटील, संदीप पाटील, अतुल माने, हणमंत लोहार, सुशिल मस्के, पोशि अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या