प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :महसूल प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत विसापूर (ता. तासगाव) येथे आयोजित विशेष महसूल शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात महसूल विभागाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांनी शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष भोर यांनी केले.यावेळी बोलताना भोर यांनी विसापूर महसूल मंडळात विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचे सांगत मंडळ अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे कौतुक केले. त्यांनी पानंद रस्ते, जिवंत सातबारा मोहीम, वारस नोंदी, वर्ग-२ जमिनी वर्ग-१ करण्याची प्रक्रिया तसेच प्राधान्य कुटुंब योजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
अतिक्रमणामुळे अनेक पानंद रस्ते बंद झाल्याची खंत व्यक्त करत त्यांनी लोकप्रतिनिधी, महसूल अधिकारी आणि शेतकरी यांच्या समन्वयातून हे रस्ते अतिक्रमणमुक्त करणे शक्य असल्याचे स्पष्ट केले. “जिवंत सातबारा” मोहिमेमुळे वारस नोंद प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून खातेदाराच्या निधनानंतर वारसांनी तत्काळ अर्ज सादर करावेत, असेही त्यांनी सांगितले.
वर्ग-२ जमिनी वर्ग-१ करण्याची प्रक्रिया शासनाने अधिक सोपी केल्याचे नमूद करत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यास प्रकरणे जलदगतीने निकाली काढली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांनी वर्ग-२ जमिनी वर्ग-१ करण्यासाठी शासनाने ३१ मार्चपर्यंत विशेष सवलत दिल्याची माहिती दिली. शासनाने निश्चित केलेली रक्कम भरून व्यवहार नियमित करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिलांच्या सन्मानासाठी राबविण्यात येणारी “लक्ष्मी मुक्ती योजना” अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (महसूल) सतीश कदम, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विशाल यादव, तहसीलदार अतुल पाटोळे, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, भूमिअभिलेख उपअधीक्षक विजयकुमार शेंडगे, जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील, पंचायत समिती सदस्य सुनील जाधव, कल्पना पाटील, प्रकाश बुरुंगले, प्रियंका माळी, मंडळ अधिकारी निलेश भांबुरे, ग्राममहसूल अधिकारी रवींद्र वालकोळी, सत्यवान सुर्वे, आशा चव्हाण, अंजना पाटील, प्रवीण साळुंखे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
शिबिरातील ठळक कामकाज :
निकाली फेरफार प्रकरणे : ६३
७/१२ दुरुस्ती प्रकरणे : २५
डिजिटल ७/१२ वाटप : ४४८
८-अ उतारे वितरण : ४४८
विविध प्रमाणपत्रे : १४३
एक खिडकी योजनेअंतर्गत अर्ज : १७४
वर्ग-२ जमिनी वर्ग-१ प्रकरणे : ३
तुकडेबंदी विक्री नियमानुकूल अद्ययावत ७/१२ : ७
घरकुल मंजुरी प्रकरणे : २
या शिबिरामुळे महसूल विभागाच्या सेवा नागरिकांच्या दारी पोहोचल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या