शिरोळ दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतावर अनंत उपकार आहेत. वाचन, भाषण आणि लेखनातून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य आणि लोकशाही मजबूत केली. त्यांनी दिलेले संविधान सामान्य माणसाच्या भाकरी आणि प्रतिष्ठेभोवती फिरते. नव्या पिढीने बाबासाहेब समजून घ्यायला हवे. भारताची नवी पिढी नाचणारी नको तर ती वाचणारी हवी. राष्ट्रीय संपत्तीचा उपयोग तळागाळातील लोकांना झाला पाहिजे. नाही रे वर्ग आहे रे वर्गात आला पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी उभी हयात खर्ची घातली. बाबासाहेब ज्ञानी होऊन वंचितांच्या कल्याणाचे कार्य त्यांच्या हातून व्हावे यासाठी रमाईने केलेला त्याग ऐतिहासिक आहे. बाबासाहेब हे केवळ वंचितांचे नव्हते तर ते बलाढ्य भारताचे महानेता होते. शिका.. संघर्ष करा आणि भारत बळकट करा असे प्रतिपादन वाणीभूषण प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले. अब्दुल लाट येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रेमकुमार मोहिते अध्यक्षस्थानी होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
प्रा. बिरनाळे पुढे म्हणाले, 'भ. बुध्दांची धर्मसत्ता गरिबांना दुःखमुक्त करणारी होती म्हणून बाबासाहेबांनी बौध्द धर्म स्वीकारला. शेती,महिला व कामगार कल्याण, विद्युत जोडणी, जलसिंचन, शिक्षण आणि समतेची क्रांती इ. क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षवेधी आहे. त्यांना मानवतावादी महामार्ग प्रशस्त केला आहे. त्यांच्या विचार वाटेवरून वाटचाल करणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल. '
दिड तास पिनड्राॅप सायलेन्स मध्ये प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. छ. शिवाजी महाराज, छ. शाहू महाराज, फुले दांपत्य आणि लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा मागोवा घेत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचे अनेक पैलू उलगडून दाखविले.
पुतळाबेन शहा बी. एड. काॅलेजचे प्रा. निलेश शिरोळकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तकुमार कदम, सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मण कांबळे, बसगोंडा कांबळे, शिरोळ पंचायत समितीचे माजी उपसभापती कुलकर्णी, सी. ए. विशाल कांबळे, पुतळाबेन शहा बी. एड. काॅलेज सांगलीचे प्रा. कल्लाप्पा माने, झेपी शिक्षक हेमंत मदने, शिरोली हायस्कूलचे संजय लाटकर, डीकेटीई काॅलेज इचलकरंजीचे ग्रंथपाल भास्कर मोहिते व संविधान प्रेमी अब्दुललाटचे नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या