प्रतिष्ठा न्यूज | योगेश रोकडे
सांगली : केंद्र शासनाने मंजूर केलेल्या ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, सांगली शहर जिल्हाच्या वतीने भव्य महिला पदयात्रा उत्साहात पार पडली. विविध क्षेत्रातील महिला, युवती व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पदयात्रेला मोठा प्रतिसाद लाभला.
मा. आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या निवासस्थानापासून पदयात्रेला प्रारंभ झाला. विश्रामबाग चौक, शहीद अशोक कामटे चौक मार्गे पुन्हा विश्रामबाग चौक होत पदयात्रेची सांगता मा. आ. डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या निवासस्थानी करण्यात आली.
यावेळी सहभागी महिलांनी ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा देत केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. पदयात्रेदरम्यान स्वाक्षरी अभियानही राबविण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी महिलांना ३३ टक्के राजकीय आरक्षण देणाऱ्या या निर्णयाचे स्वागत करत, या विधेयकामुळे महिलांच्या सशक्तीकरणाला चालना मिळेल आणि राजकीय क्षेत्रातील महिलांचा सहभाग अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या पदयात्रेत भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे, भाजपा ज्येष्ठ नेत्या सुमनताई खाडे, जयश्रीताई पाटील, मंजिरीताई गाडगीळ, भारती दिगडे, समाजकल्याण सभापती गीता पवार, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, माजी महापौर संगीता खोत, समाजसेविका सुरेखा शेख, राजमती योग ग्रूपच्या उज्वला चौधरी, ओम शांतीच्या विद्या बहनजी, सर्व नगरसेविका, जि. प. सदस्या, प. स. सदस्या, महिला पदाधिकारी, विविध महिला संघटना, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय कॅडेट कोअर, बचतगट प्रतिनिधी तसेच कॉलेज युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.
टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या